Saturday, January 9, 2016

गॉसिप

प्रिय नानू नागपूरकर यास,
​​
अरे देशात आणि जगात काय काय घडामोडी सुरू आहेत.म्हटले तुला कळवावे.तू टीव्ही आणि वर्तमानपत्रांशी फारकत घेतली आहेस.त्यावरच्या आणि त्यातल्या बातम्यांमध्ये बातमी असतेच कोठे असा तुझा आजचा सवाल नाही;गेल्या कित्येक वर्षांपासून तुझ्यासकट सर्वांना तो छळतो आहे,तरी आम्हा मर्त्य मानवांना सकाळच्या प्रहरी चहाबरोबर किमान एकदोन वर्तमानपत्रे तरी लागतातच आणि दिवसभर सर्वच माध्यममात्राकृपेने मनुष्यप्राण्यांपर्यंत बातम्या उगाळून क्षणोक्षणी पोहोचवल्या जात असल्या तरी रात्री टीव्हीवर बातम्या पहिल्याखेरीज आणि अनेकांची अमृतवाणी ऐकल्याखेरीज दिवस सत्कारणी लागला असे वाटत नाही.बाकी टीव्हीवरचे काय आणि वर्तमानपत्रांतले काय,पत्रकारू सर्वत्र सारखेच!इतके;की यास झाकावा आणि त्यास काढावा!काय आहे की ह्या सर्वांनी सुरुवातीला प्रिंट मिडियाचीच धुळाक्षरे गिरवलेली आहेत.अर्थात त्यात गैर काहीच नाही!पण त्यामुळे हे असे व्हायचेच!अल्पसंख्यांक समुदायाचा कैवार घेणाऱ्या, त्यांच्याविरुद्ध इवले काही घडले की  आकाश-पाताळ एक करणाऱ्या अनेक दिग्गज पत्रकारू मंडळींना बहुसंख्यांकावर होणारे अत्याचार दिसत नसल्यामुळे त्यावर ते मौन बाळगतात,हे पुन्हा एकदा एवढ्यातल्या घडामोडींवरून नव्याने सिद्ध झाले.असो.
त्यामुळे टीव्हीवर आता काय बघावे ,हा प्रश्न उरतोच!मी त्या मालिका कधीच बघितल्या नाहीत. मालिकांमध्ये एवढे दागदागिने आणि भरजरी कपडे,लग्नात घालावयाच्या साड्या वगैरे घालून घरात वावरणाऱ्या,चटचट कामे वगैरे उरकून स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया बघून मला आपले नवल वाटते की ह्यांना हे सगळे जमतेच कसे!आपण प्रत्यक्षात तसे करायला जावे,तर आपल्या भरजरी साड्यांवर तेला-तुपाचा वा हळदीचा डाग हमखास पडतो!मात्र समस्त स्त्रीवर्ग ह्या मालिकांचा चाहता आहे,असे ऐकते. प्रेक्षकवर्गातल्या झाडून साऱ्या स्त्रिया मालिकांमधल्या स्त्रियांच्या साड्यांवर गॉसिप करीत असतात. पण त्यात काय एवढे ?साड्यांवर गॉसिप आणि चर्चा तर संसदेतही होत असते.आपल्याला आपले वाटत होते की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी गंभीर मुद्रेनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या,जीएसटी बिल,अन्नसुरक्षा,महागाई इत्यादी आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांवर बोलत असतील, किमान संसदेत आपापसांत चर्चा करीत असतील;पण तुला म्हणून सांगते... प्रत्यक्षात तिथे जेव्हा महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा सुरू असते,तेव्हा अनेक जण म्हणे साड्यांवर गॉसिप आणि चर्चा करीत असतात.अनेक जण डुलक्या घेतात,त्यापेक्षा हे बरे!याआधी तिथे सहा दशके तरी गरीबी हटवण्यावर गॉसिप आणि चर्चा होत होती,ते आठवले!गरीबीवर गॉसिप करणाऱ्यांची गरीबी हटली ! असो!
​​
बाकी नोव्हेंबर- डिसेंबर म्हणू नको आणि आता जानेवारी म्हणू नको,दिल्ली दिल्ली वाटतच नाहीये-म्हणजे आता या सक्तीच्या सम-विषम संख्येच्या वाहनांच्या घोळामुळे दिल्ली दिल्ली वाटत नाहीये, लोकांना प्रचंड त्रास होतोय,मेट्रोत खच्चून गर्दी आहे आणि मेट्रोनं काही सगळीकडे जाता येत नाही, तरीपण लोक योजना यशस्वी झाली म्हणून आपली पाठ आपणच थोपटून घेताहेत,ते नव्हे!दिल्लीत यंदा थंडीच नाही.यंदा लोकांनी मफलर  नाही,खोकला नाही,हे खरे आहे, पण दिल्लीत यंदा थंडीच नाही,ही चिंतेची बाब आहे.यंदा सरसोंका साग-मक्के की रोटी,गाजर का हलवा,गरमागरम जलेबी,कढईत उकळणारं दूध,भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा,गजक(म्हणजे आपली शेंगदाण्याची चिक्की )ह्या सगळ्यांचा आस्वाद घेण्यासाठी आवश्यक असलेली थंडी नसल्यानं मोठीच पंचाईत झाली आहे.अगदी अमेरिका असू दे,की युरोप,यंदा तिथे नेहमीसारखी,असायला हवी तेवढी  थंडीच पडली नाहीये,हा चिंतेचा विषय आहे.त्यामागे अर्थातच ग्लोबल वार्मिंग आहे,हा मोठाच चिंतेचा विषय आहे.तुलाही त्याची चिंता आहेच!त्यावर पुढे कधीतरी !तूर्तास एवढेच!
- रश्मी घटवाई